Ad will apear here
Next
‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग!’
मुळ्ये यांचे घर

कोकणातली पारंपरिक दिवाळी कशी सुवर्णमयी आणि स्वर्गसुखासमान होती, याचं स्मरणरंजन केलंय रत्नागिरीच्या स्वाती जोशी यांनी...
......
दिवाळी म्हटलं की माझ्या लहानपणीचा सुवर्णकाळ आठवतो. रत्नागिरीपासून २५ किलोमीटरवर वसलेलं आमचं  वळके गाव. माझे आजोबा दत्तात्रय मुळ्ये त्या गावचे खोत. ‘खोती अॅबोलिशन अॅक्ट’ जरी १९४९पासून लागू झाला असला, तरी साधारण १९८०च्या दशकापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचे पूर्वी असलेले व्यवहार तसेच सुरू होते. आजोबांच्या खोतीचा अगदी सुवर्णकाळ म्हणावा, असा काळ मी लहानपणी पाहिलाय. आमच्या गावातील सुमारे ५० टक्के जमिनी आजोबा आणि त्यांच्या चुलतभावांच्या मालकीची होती. पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांनी कोकणात कऱ्हाडे ब्राह्मणांना जागा-जमिनी देऊन गावंच्या गावं वसवली होती. त्यांना गावाची निम्मी मालकी देऊन कुळांकडून खंड वसूल करण्याचा अधिकार होता. आजोबा स्वत: शेती करीत असत आणि काही जमिनी कुळांना कसण्यासाठी देऊन अर्धेलीने त्याचं उत्पन्न घेत असत. त्या वेळच्या दिवाळीची आठवण मात्र आजही ताजी आहे. 

आजोबा दत्तात्रय सदाशिव मुळ्ये (खोत) व आजी यशोदा दत्तात्रय मुळ्ये.आमच्या घरी नवरात्र संपून दसरा उजाडला, की दिवाळीचे वेध लागायचे. गणपती, नवरात्रीच्यावेळी घर झाडलेलं असलं, तरी दसरा झाल्यावर परत पूर्ण झाडून सारवलं जायचं. आजी, काकू, आई वगैरे बायका घरच्या भाताचे भरपूर पोहे घरीच कांडायच्या. दिवाळीच्या इतर फराळापेक्षा प्रचंड प्रमाणात कडबोळी केली जायची. अगदी हारेच्या हारे (हारे म्हणजे मोठ्या टोपल्या) भरून असायची ती. आम्ही लहानसहान मुलंपण हौसेनं कडबोळी करायला धडपडत असायचो. म्हणजे दिवाळीचा लाडू, चिवडा, करंजी, चकली, कडबोळी असा सोवळ्यातला फराळ करून कपाटात गेला, की आम्हाला त्यात भाग घेता येत असे. चकलीला तेव्हा काटे कडबोळी म्हणत असत. तर ही इतकी कडबोळी खात कोण असेल, याचं उत्तर दिवाळीच्या दिवशी मिळायचं. 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे फटाके लावायला आम्हाला बाबा किंवा काका उठवत असत. तेव्हा ओटीवर साडेसहा फूट उंचीचे, भरदार शरीराचे आजोबा नुसता पंचा नेसून उघडे बसलेले असत. त्यांच्या कुळांपैकी सगळ्यात जो पैलवान असेल, तो त्यांना मालिश करायला आलेला असे. आजोबा आणि त्यांना सुगंधी तेलानं मालिश करणारा तो गडी बघूनच आम्हाला धडकी भरायची. मग पटकन उठून तोंड धुवून फटाके घेऊन अंगणात पळून जायचं. फटाके वाजवून अर्ध्या-पाऊण तासानं आलं, तरी यांचं रगडणं चालूच असायचं. खोत आणि कूळ यांचं मनाचं समाधान झालं, की ते आवरतं घ्यायचे. तोपर्यंत दुसरा गडी न्हाणीघरात पाणी तापवत असायचा. मग तो उटणं लावून पितळी घंगाळात गरम गरम पाणी काढून द्यायचा. पाटाचं पाणी खळखळत वाहत असायचं आणि तोंडानं स्तोत्र म्हणत आजोबांचं कडाक्याच्या थंडीत अभ्यंगस्नान चालू असायचं. 



ते आंघोळीला गेले की बाबा, काका, दादा व इतर चुलतभाऊ मालिशसाठी बसत. त्याच वेळी मागच्या पडवीत कुळांच्या बायका आम्हा मुलींना तेल लावून रगडून काढत असत. जसा नंबर लागेल, तशा त्या बायका आम्हाला न्हायला घालत. मी मुलींच्यात शेंडेफळ असल्यामुळे माझा नंबर शेवट असायचा. एकतर भयंकर थंडी असायची आणि त्यात त्या आयाबाया येऊन इतक्या मस्त मालिश करून द्यायच्या आणि कढत कढत पाण्याने अंघोळ घालायच्या ना...! पूछो मत...! स्वर्ग स्वर्ग म्हणजे तरी वेगळं काय असं वाटायचं. आंघोळ करून बाळासारखं गुरगटून झोपून जायची इच्छा असायची खरं तर! पण पुढे पोह्यांचा फराळ असायचा. त्यासाठी जागं राहावंच लागायचं. 

आजोबांचं अभ्यंगस्नान होईपर्यंत आजीने पूजेची तयारी केलेली असायची. सोवळ्याने पूजा करून देवाला फराळाचा, दही-पोहे, दूध-पोह्यांचा नैवेद्य दाखवून मग ते नेहमीचं शुभ्र धोतर नेसून, पांढरा सदरा आणि फेटा अशा वेशात अंगणात लाकडी खुर्चीवर बसायचे. बाजूला एक बाकडं असायचं. त्याच्यावर एक पोहे भरलेला आणि दुसरा कडबोळी भरलेला हारा असायचा. सकाळचे सात-साडेसात वाजलेले असायचे. त्या काळी गावात वीज नव्हतीच. त्यामुळे घराच्या पुढच्या बाजूला रेज्यांमध्ये रांगेत पणत्या लावलेल्या असायच्या. बाबा पायलीचा आकाशकंदील करून त्यात मध्ये पणती ठेवायचे. त्या उजेडात बसलेल्या ‘दत्तूभाऊ खोतां’ची ती दणकट आकृती अजूनही डोळ्यासमोर येते. मग एकेक करून गावकरी येत. आजोबांना नमस्कार करून, बरोबर आणलेल्या मुला-नातवंडांना पायावर घालत असत. प्रत्येकाला आजोबा त्यांच्या त्या भल्याथोरल्या पंजात मावतील तितके पोहे आणि परत दुसऱ्या हाऱ्यात बुचकी मारून मुठीत येतील तेवढी कडबोळी देत असत. पहिला हारा संपण्यापूर्वी लगेच दुसरा हारा तिथे हजर करण्याचं काम बाबा किंवा काका करत. मला नेहमी आश्चर्य वाटायचं, की इतकी माणसं येतात त्यांना देऊनही पोहे किंवा कडबोळी संपत कशी नाहीत? अर्थात त्यामागे आजीचं नियोजन असायचं हे तेव्हा कळत नव्हतं. सगळे गावकरी येऊन गेले, की मग फराळ होऊन नेहमीची कामं सुरू व्हायची. 

१९८२मध्ये आजोबा गेले तेव्हा अख्खा गाव जमला होता. त्यानंतरची दिवाळी सुनीसुनी गेली. तिथून पुढे दिवाळीची ती गंमत कधीच आली नाही. अजूनही गावात कोणाचंही लग्न किंवा काही कार्य असलं की बाबांना आवर्जून आमंत्रण असतं. नव्या जोडप्याला त्यांच्या पाया पडून खोतांच्या मानाचा नारळ दिला जातो. तरीही दिवाळी म्हटली की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मनात वाटतं ‘अब वो बात नहीं रही!!!’

संपर्क : स्वाती संजय जोशी
२९२२, हेड पोस्ट ऑफिसमागे, रत्नागिरी - ४१५६१२. 
मोबाइल : ९४२१२ ३३१८२. 
ई मेल : sgmulye8570@gmail.com

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVZBU
 मस्त1
 Kharokhar heva vatnari diwali asaychi teva2
 Chan1
 Touching. Though I belong to coastal Karnatak, things happened in similar fashion with us too. What we have today is a memory of those days. Thanks a lot. Take care.1
 Atishay surekh Ani suhrudya lekh, ajobanchi wyaktirekha murtimant ubhi keli ahes. Khup khup shabasaki. Junya athawani jagya zalya.
 Junya athavanina ujala milala
Similar Posts
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
‘लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व’ लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व कसे होते, याबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत साखरप्याचे अमित केतकर यांनी...
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण काही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... दिवाळीत केलेला व्यवसाय हा आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ कसा ठरला, याबद्दल लिहीत आहेत बोरीवलीचे नितीन जोगळेकर...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language